
वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या खडकी ( सदार )येथील हभप गुरुवर्य काशिनाथ महाराज बाजड हे दि. 1सप्टेंबर रोजी विठ्ठल चरणी विलीन झाले. महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी केवळ जोपसलीच नव्हे; तर ती अखंडित ठेवण्याचे काम आयुष्यभर केले. तुकोबाची गाथा, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, सर्व संतांचे हरिपाठ आणि जीवनाचे सार सर्व सामान्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. संस्कार, संस्कृती आणि संतत्वामध्ये आयुष्यभर जगलेले गुरुवर्य काशिनाथ महाराज बाजड कायमस्वरूपी वैकुंठवासी झाले आहेत. त्यांच्या कार्याला आणि जीवनशैलीला निष्काम कर्मयोगी म्हणून श्रद्धांजली वाहण्यासाठी दैनिक लोकतंत्र परिवाराकडून हे आदराचे अभिवादन..!
रिसोड नजिकच्या खडकी ( सदार ) येथे वास्तव्यास असलेले हभप गुरुवर्य वै. काशिनाथबाबा बाजड हे एक उत्तम प्रवचनकार, कीर्तनकार आणि भागवत कथा वाचक होते. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द हे अमृततुल्य होते. त्यांनी आपल्या सहज आणि सोप्या वाणीतून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे; तर जिल्ह्याबाहेरील अनेक गावात भागवत कथा, गाथा पारायण केले आहे. दिंडी सोहळा, कीर्तन, भारूड आदी माध्यमातून राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकत ठेवण्याचे महानकार्य केले आहे. परमार्थ करतांना कुठलाही स्वार्थ न करता विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथे महाराष्ट्रातून पहिला दिंडी सोहळा नेण्याचा मान वै. काशिनाथबुवा यांनी मिळवला होता.हजारो भागवत कथा,असंख्य कीर्तने करत त्यांनी गावोगावी हरीनाम सप्ताह उभे केले. आपल्या रसाळ वाणीतून महाराजांनी युवा पिढीला वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्याचे कार्य केले आहे. सोबतच प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना भक्तीचा आणि सदाचाराचा मार्ग दाखवून आध्यात्मिक कार्यासाठी प्रेरित केले. आयुष्यभर समाजाची सेवा केली. व्यसनाधीस्त झालेल्या तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी गुरुवर्य काशिनाथ बाबा यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या या महान कार्याचा सकारात्मक परिणाम होऊन अनेकांचे संसार सुखाचे झाले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अभंग मुखोद्धगत सांगण्याची त्यांच्यात विलक्षण क्षमता होती.
उद्धारिले कुळ आपण तरला |
पूर्ण तोचि झाला त्र्यलोक्यात ||1||
त्र्यंलोक्यात झाले द्वैतची निमाले |
ऐसे साधियले साधन बरवें || 2 ||
बरवें साधन सुखशांति मना |
क्रोध नाही जना तीळभरी || 3 ||
तीळभरी नाही चित्तासी तो मळ |
तुका म्हणे जळ गंगेचे..
संत तुकोबारायांच्या ह्या अभंगानुसार वैकुंठवासी हभप गुरुवर्य काशिनाथ महाराज बाजड हे आयुष्यभर जगले. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आदी पवित्र ग्रंथाचे उपासक, वारकरी वैभव, कीर्तन मर्मज्ञ, चिकित्सक, भजनानंदी व्यक्तित्व आणि कीर्तन, भजन, कथा हाच जीवनाचा गाभा असणाऱ्या महाराजांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी खडकी ( सदार ) येथे पार पडणार आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यापश्चात भाऊ अर्जुन व लक्ष्मण नामदेव बाजड, पुतण्या भगवान पंढरी बाजड, आणि पुत्र जनार्धन,हभप नारायण, व तुळशीराम काशिनाथ बाजड आदींचा समावेश आहे. त्यांच्या निधनामुळे समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ हरवला असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या विचारांना आणि शिकवणींना अनुसरून जीवन जगण्याची सर्वांना शक्ती मिळो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना.
