HomeUncategorizedवाशिमचा तेजस्वी तारा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला !

वाशिमचा तेजस्वी तारा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला !

तेजस बाजड करणार जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
ग्रामीण भागातील बहुजनांची मुलंसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतात, हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या नावली येथील तेजस श्रीधर पाटील बाजड या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. विदर्भातील हा तरुण संशोधक जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तेजस बाजडच्या या तेजस्वी कामगिरीने वाशिमसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या शालेय जीवनातील कटू – सुखद अनुभवांतून नवीन भरारी घेत या शेतकरीपुत्राने वाशिम जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवले आहे. परिणामी तेजसवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रिसोड तालुक्यातील नावली या गावाचे पोलिस पाटील श्रीधर पाटील बाजड यांचे चिरंजव तेजस बाजड या तरुणाने जागतिक पातळीवर कौतुकास्पद यश संपादन केले आहे. अमरावती येथील एसआरएम युनिव्हर्सिटी-एपी येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेत अंतिम वर्षाचा अभ्यास करत असलेल्या तेजस याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत आपली छाप उमटवत बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळवला आहे. सदर बहुमान एएनआरएफ-एसईआरबी यांच्या संमर्थनाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.
याचबरोबर तेजसची जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या परिषदेसाठी निवड झाली आहे. या परिषदेत जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ,
संशोधक आणि विद्याथ्यांचा सहभाग असून, भारताच्या वतीने तेजस प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्याच्या नाव लौकीकात विशेष भर पडली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलेला तेजस अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अभ्यासक्रमा दरम्यान तेजसने अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या प्राध्यापकांनी व विद्यापीठ प्रशासनाने या यशाबद्दल तेजसचे विशेष कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला पुरस्कार विद्यापीठासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. तर वाशीम जिल्ह्यातून निघालेला हा तरुण संशोधक आता जागतिक पातळीवर झळकणार असून, त्याच्या यशाने जिल्ह्याचा सन्मान अधिक उंचावला आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी झालेली निवड, पुढील आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार !
         ____ तेजस बाजड

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार याचा खुप आनंद होत आहे. कारण जगाच्या विविध भागातून येणाऱ्या अनेक तरुण संशोधकांचे व विद्यार्थ्यांचे विचार मला ऐकून व समजून घेता येणार आहेत. त्यामुळे आपसुकच खुप काही नवीन शिकायला मिळणार असून ही निवड माझ्या पुढील आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. भविष्यात देशाचे नाव उज्वल करण्यासाठी संशोधन विषयात कठोर परिश्रम करणार आहे. तद्वतच ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांसाठी कार्य करणार असल्याचे मत तेजस बाजड यांनी दैनिक लोकतंत्रशी बोलतांना व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular