आ.अमित झनक यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून, सर्वसामान्यांशी अतूट नाळ जोडणारे वाशिम जिल्ह्यातील झनक घराणे गेल्या तीन पिढ्यापासून राज्यभर सुपरिचित आहे.स्व.आ.रामरावजी झनक यांच्यापासून सुरु झालेला जनसेवेचा वसा आजमितीसही अविरतपणे सुरूच आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी असतांना सुद्धा स्व. सुभाषराव झनक यांनी शेती, शेतकरी आणि मातीशी असलेली निष्ठा तसूभरही ढळू दिली नव्हती. कदाचित त्यामुळेच त्यांना ‘ बळीराजा ‘ ही उपाधी सर्वासामान्य जनतेने बहाल केली आहे. आणि तीच परंपरा आजही आ. अमित झनक जोपासात आहेत.सलग चार वेळा विजयश्री प्राप्त करणारे आ.अमित झनक नेहमी आमदार म्हणून नव्हे; तर एक शेतकरी म्हणून सर्वसामान्य जनतेत वावरत असतात.त्यामुळे त्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी झालेली निवड ही सर्वसामान्य शेताकऱ्यांचा ‘ सन्मान ‘ असल्याचे बोलले जात आहे.
आपल्या कार्यकुशलतेने घराण्याची शेतीनिष्ठ ही परंपरा उज्जवल करणारे आ. अमित झनक हे कर्तव्यतत्पर व दूरदृष्टी असणारे शेतकरीनेते म्हणून ओळखले जातात.त्यांची कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची भूमिका नेहमीच मोलाची ठरत आहे. त्या अनुषंगाने शासन-शेतकरी-शास्त्रज्ञ यामधील महत्वाचा दुवा म्हणून कार्यकारी परिषद सदस्य महत्वाची भूमिका बजावत असतात.शेती आणि शेतकरी यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव असणारे आ.झनक यांची नियुक्ती वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बळकटी देणारी ठरेल असे सर्वसामान्य शेतकरी बोलत आहेत.सदर कार्यकारी परिषदेचे मुख्य कार्य म्हणजे विद्यापीठाचे सर्वोच्च कार्यकारी प्राधिकरण म्हणून काम पाहणे. यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठाचे धोरण निश्चित करून त्याचे नियोजन करणे. विद्यापीठ आणि शासनासोबतच शेतकरी व कृषी शास्त्रज्ञामध्ये समन्वय साधून विविध कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यावर विशेषभर देणे आदी महत्वाची कामे कार्यकारी परिषद पार पाडत असते. त्यासाठी या परिषदेवर कृषी तज्ञ, शास्त्रज्ञ आणि प्रत्यक्ष कृषी क्षेत्राचा अनुभव असलेल्या आमदारांची सदस्य म्हणून निवड केल्या जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आ.अमित झनक हे एक अनुभवी शेतकरी असल्याने शेती क्षेत्रातील गरजा आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने ओळखून ते आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.तद्वतच आ. झनक यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी झालेली निवड हा तमाम शेतकऱ्यांचा सन्मान असल्याचे रिसोड-मालेगाव मतदार संघातील सर्वसामान्य जनता बोलत असून भविष्यात बळीराजाला अधिक बळकटी मिळणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
” डॉ. पंजाबराव देशमुख हे कृषीक्षेत्रातील आधुनिक विचारवंत म्हणून ओळखले जातात. देशाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासाचा पाया हा कृषीक्षेत्राशी व शेतकऱ्यांशी निगडीत आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय आपल्या कृषीप्रधान देशात सर्वांगीण विकास साधता येणार नाही. असे त्यांचे स्पष्ट विचार होते. त्यांच्या या विचारांचा पाईक म्हणून मी या ठिकाणी माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन..!”
—– आ. अमित झनक
( रिसोड-मालेगाव विधानसभा )
