HomeUncategorizedवाशिमच्या वारकरी परंपरेतील तेजस्वी दीप मालवला.

वाशिमच्या वारकरी परंपरेतील तेजस्वी दीप मालवला.

ब्रह्मनिष्ठ ह.भ.प. घोळवे बाबांचे आज हस्तिविसर्जन भावपूर्ण श्रद्धांजली.

आकाश पाटील

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्याच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘घोळवे बाबा’ म्हणून सुपरिचित असलेले ब्रह्मनिष्ठ ह.भ.प. दत्तात्रय महाराज घोळवे यांचे काल दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:२० वाजता वैकुंठगमन झाले. त्यांच्या जाण्याने वाशिम जिल्ह्याने एक निस्वार्थी, निरपेक्ष आणि खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करणारा संत गमावला आहे.
साधेपणा, प्रेम, माणुसकी आणि सद्गुणांची शिकवण हेच त्यांच्या जीवनाचे सार होते. स्वतःच्या आचरणातून जीवन जगायला शिकवणारे घोळवे बाबा, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व पटवून देत असत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महान कार्य अविरत सुरू ठेवले.

अनेक गावातील हरिनाम सप्ताहाचे संस्थापक.

ब्रम्हनिष्ठ हभप. दत्तात्रय महाराज अर्थात घोळवे बाबा हे मराठवाड्यातून आलेले एक महान किर्तनकार व प्रवचनकार होते. सुरुवातीला ते रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथे स्थायिक झाले. आणि त्यांच्या मार्गदर्शनातच येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. तीच परंपरा गेल्या ५५ ते ६० वर्षापासून आजतागायत सुरू आहे. त्यामुळे घोळवे बाबांना संपूर्ण गाव आपले ” गुरुवर्य ” म्हणून मानते. आणि असेच बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा अनेक गावात त्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा रोवला आहे.त्यामुळे वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात बाबांचे खुप मोठ्या प्रमाणात शिष्य आहेत. त्यांच्या वैकुंठ गमनामुळे वारकरी संप्रदायात खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ज्यांच्या सहवासाने विचारांना दिशा आणि मनाला समाधान मिळाले अशा या लाडक्या व मार्गदर्शक व्यक्तिमत्वाला दैनिक लोकतंत्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES

Most Popular