HomeUncategorizedसर्वांचे लाडके " मामा " तळणकर काळाच्या पडद्याआड !

सर्वांचे लाडके ” मामा ” तळणकर काळाच्या पडद्याआड !

हरहुन्नरी व्यक्तित्व हरपले; पंचक्रोशीत हळहळ व्यक्त.

वसंत खडसे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या मोप गावातील ” मामा ” म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे स्व. जनार्दन बाबुराव तळणकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मनमिळावू स्वभाव आणि सर्वांशी हसूनखेळून वागणारे स्व. तळणकर लहान – थोरांचे मामा म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे मोप गावासह, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व. जनार्दन तळणकर हे सोनार समाजाचे होते, मात्र आपल्या पारंपरिक व्यवसायाला फाटा देत त्यांनी इलेक्ट्रिक आणि डिझेल मॅकनिक म्हणून व्यवसाय सुरू केला. मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करून वागण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे तळणकर परिवार हे एक अजातशत्रू कुटुंब म्हणून मोप गावात ओळखले जाते. स्व. तळणकर मामा यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे केला, त्यामुळे ते आसपासच्या परिसरात सुद्धा ‘ मामा ‘ म्हणूनच ओळखले जात होते.कदाचित, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपला पारंपरिक स्वर्णकलेचा व्यवसाय करता आला नसेल, मात्र त्यांच्या अंगीअसलेलं कौशल्य त्यांनी निवडलेल्या व्यवसायातून अधोरेखित होत होतं. एक मॅकनिक म्हणून त्यांनी आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह करून त्यांना समाजात स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. अशा या हरहुन्नरी व्यक्तित्वाच्या निधनामुळे केवळ मोप गावातूनच नव्हे; तर संपूर्ण परिसरातील गावातून हळहळ व्यक्त होत आहे. स्व. तळणकर मामा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांना शक्ती देवी ! दैनिक लोकतंत्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

रागातून वात्सल्य प्रगट करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ‘ मामा ‘

स्व. जनार्दन तळणकर मामा यांचा मुलगा अनिल तळणकर आणि मी इयत्ता पाचवी पासून मॅट्रीक पर्यंत वर्गमित्र होतो. त्यामुळे साहजिकच मी स्व. मामांना जवळून अनुभवले आहे. अनिल सोबत त्यांच्या घरी गेल्यावर, कसा आहेस ! अभ्यास काय म्हणतो ! अशी मोठ्या आस्थेने विचारपूस करायचे. शाळेला दांडी मारण्याचा प्रकार मामाच्या लक्षात आला की, लगेच दुसऱ्या दिवशी मामा वडिलकीच्या नात्यातून रागवायचे, संतापून बोलायचे पण त्यांच्या त्या संतापात आणि रागावण्यात एक प्रकाराचा वात्सल्याचा झरा होता. हे केवळ मीच नव्हे: तर आमच्या अनेक मित्रांनी सुद्धा अनुभवले आहे. त्यामुळे आमचा सर्व मित्र परिवार सुद्धा शोक व्यक्त करीत आहे. अनिल तळणकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आमचा सर्व मित्र परिवार सहभागी आहोत.
 ___ वसंत खडसे 

( शेलुखडसे ता. रिसोड )

RELATED ARTICLES

Most Popular