HomeUncategorizedनवरात्रोत्सवात पोलीस प्रशासनाची चोख खबरदारी!

नवरात्रोत्सवात पोलीस प्रशासनाची चोख खबरदारी!

नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च; विसर्जन मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन.

वसंत खडसे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

रिसोड : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी रिसोड पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान रिसोड शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमधून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस प्रशासनाची सज्जता आणि सतर्कता अधोरेखित झाली. पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पवार व रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च पार पडला. या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांसह राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) जवान, आरसीबी पथक आणि होमगार्ड सैनिक सहभागी झाले. पोलीस यंत्रणेतील विविध पथकांच्या सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विविध सुरक्षा पथकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले. उत्सवाच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने या रूट मार्चला विशेष महत्त्व आहे. केवळ रूट मार्चपुरते मर्यादित न राहता, पोलीस प्रशासनाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दुर्गादेवी विसर्जनाच्या मुख्य मिरवणूक मार्गाची तसेच विसर्जन स्थळाची पाहणी केली. मिरवणुकीदरम्यान आवश्यक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेशी संबंधित बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. समन्वयातून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES

Most Popular