वाशिम जिल्हा पुन्हा हादरला
सायखेडा अन्… चिंचांबाभर एकाच दिवशी दोन बळी
दुष्काळाची दाहकता की प्रशासनाची उदासीनता?

वसंत खडसे दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : सहा तालुक्यात दुष्काळाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. २७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. पावसाअभावी करपलेल्या पिकांनी आणि कर्जाच्या ओझ्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात दुष्काळाची दाहकता अत्यंत तीव्र झाली असून आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा पुरता खचला आहे. या खचलेल्या मनस्थितीतून जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाल्याचे भीषण चित्र समोर येत आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही केवळ घटना नाही, तर दुष्काळाने होरपळलेल्या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे.पहिली घटना : सायखेडा (मंगरुळपीर)मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथील ५८ वर्षीय शेतकरी अशोक गोबरा जाधव यांनी खरीप हंगाम पूर्णपणे नापीक झाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगरुळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग क्र. ४८/२०२६, कलम १९४ BNSS) केली आहे. मृताचा मुलगा श्रावण जाधव याने जबानीत स्पष्ट म्हटले आहे की, “शेतीने साथ न दिल्याने आणि संपूर्ण शेती नापीक झाल्याने वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले.”दुसरी घटना : चिंचांबाभर (रिसोड)त्याच दिवशी रिसोड तालुक्यातील चिंचांबाभर येथील ३५ वर्षीय युवा शेतकरी सुनील लक्ष्मण मुकीर यांनी देखील स्वतःच्या शेतातील सोयाबीन पीक पावसाअभावी डोळ्यादेखत करपून गेल्याने उद्विग्न होऊन गळफास घेतला. या तरुण शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. एकाच दिवशी दोन घरातील कर्ते पुरुष गेल्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.दोन्ही घटनांमधून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट, नापिकी आणि दुष्काळाची दाहकता अधोरेखित होत आहे.
केवळ घोषणा नकोत, तातडीची मदत हवी!
पावसाची ओढ, करपलेली सोयाबीन-तूर, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न… ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड मानसिक व आर्थिक दबावाखाली आहे. वाशिम जिल्हा मुळातच आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असताना दुष्काळाने पुन्हा होरपळून काढले आहे.
प्रश्न असा आहे – केवळ दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याच्या फायलीत ही प्रकरणे दडपणार का? शेतकऱ्याला आज सहानुभूती नको, तर थेट मदत हवी आहे. हेक्टरी सरसकट आर्थिक मदत, कर्जमाफी आणि चारा-छावण्यांची तातडीने गरज आहे. अन्यथा सायखेडा आणि चिंचांबाभर ही केवळ सुरुवात ठरेल, अंत नाही!



