बोलेरो बनली रुग्णांसाठी जीवनदायी.
प्रसूती असो वा अपघात, 24 तास मोफत सेवा; अल्पभूधारक शेतकऱ्याने जपली माणुसकी.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : आज माणूस स्वतःपुरता जगत असताना, आपल्याच आई-वडिलांना पाणी द्यायला अनेकांकडे वेळ नसतो,मात्र रिसोड तालुक्यात येत असलेल्या श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने माणुसकीचा असा दीप लावला आहे, की त्याच्या प्रकाशात संपूर्ण वाशिम जिल्हा उजळून निघाला आहे. त्या दीपाचं नाव आहे – शंकर बोडखे
गावात अचानक कुणाची प्रसूतीची वेळ आली, कुणाला हृदयविकाराचा झटका आला, शेतात किंवा रस्त्यावर अपघात झाला, की पहिला प्रश्न असतो – दवाखान्यात न्यायचं कसं? १०८ ची वाट पाहण्यात अनेकदा अनमोल वेळ निघून जातो आणि जीव जातो.
हाच प्रश्न ओळखून शंकर बोडखे यांनी एक धाडसी आणि हृदयस्पर्शी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या कष्टाने घेतलेली नवीन बोलेरो गाडी गावातील रुग्णांसाठी २४ तास मोफत उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे आजवर शेकडो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले आहेत.
विशेष म्हणजे, ही सेवा फक्त लोणी बुद्रुकच्या आसपास असलेल्या शहरापुरती मर्यादित नाही. तर लोणीच्या रुग्णाला महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात जायचे असेल, तरी शंकरराव निःशुल्क घेऊन जातात.
” समाजाचे देणे लागतो” ____ शंकर बोडखे
या कार्याबद्दल बोलताना शंकर बोडखे भावुक होऊन म्हणाले,
“मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. समाजाने मला खूप काही दिले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मी ही सेवा सुरू केली. यासाठी माझे मित्र विजय गरकळ डिझेलसाठी मदत करतात. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत ही सेवा अविरत सुरू राहील. या सेवेतून जो आनंद मिळतो, तो पैशात मोजता येत नाही.”
शंकररावांच्या या कार्याची दखल घेऊन ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला. यावेळी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामू इंगोले उपस्थित होते. जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बोलेरो ठरली जीवनदायिनी.
या सत्कार सोहळ्यात बोलतांना, रामराव जाधव (लोणी बुद्रुक) म्हणाले, “माझ्या मुलीच्या प्रसूतीसाठी देऊळगाव राजाला जायचे होते. गावात भाड्याची गाडी मिळत नव्हती. शंकरने क्षणाचाही विलंब न करता आपली बोलेरो दिली. वेळेवर दवाखान्यात पोहोचलो म्हणून लेक आणि नात दोघे सुखरूप आहेत. शंकर आमच्यासाठी देवदूतच आहे.”
दुष्काळातही माणुसकी ओलावली.
आज दुष्काळी परिस्थितीत प्रत्येकजण स्वतःची गाडी स्वतःपुरती वापरत असताना, शंकर बोडखे यांनी आपली गाडी समाजासाठी वाहिली. जिथे लोक पाण्यासाठी भांडतात, तिथे शंकरराव रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते जपत आहेत. त्यांची ही बोलेरो म्हणजे चार चाकी गाडी नाही, तर धावती-फिरती रुग्णवाहिका आणि माणुसकीची घट्ट भिंत आहे. दैनिक लोकतंत्र परिवारातर्फे या देवदूताला सलाम!



