पाच हजारांच्या मदतीत शेतकऱ्यांनी सावरायचे तरी कसे?
दुष्काळी परिस्थितीची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पाहणी.

वसंत खडसे

वाशिम : शेतात उभे असलेले पीक डोळ्यांदेखत करपावे, सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरू नयेत आणि वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरावे, अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याऐवजी केवळ आश्वासनांवर किती दिवस भागवायचे? पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना, पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत पुरेशी ठरते का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत रिसोड–मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. रिसोड तालुक्यातील केनवड व मालेगांव परिसरातील शेतांमध्ये जाऊन त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, आर्थिक संकट आणि शेतीच्या भवितव्याबाबतची चिंता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रत्यक्ष अनुभवली.
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने आणि उन्हाच्या तीव्रतेत वाढ न झाल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे न भरणे, पिके करपणे आणि उत्पादन घटण्याची भीती यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीसाठी केलेला खर्च, कर्जाचा भार आणि त्यातून अपेक्षित असलेले उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असल्याची भावना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
अशा गंभीर परिस्थितीत नुकसानभरपाईची मदत प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणाशी सुसंगत असावी ! अशी अपेक्षा देखील सपकाळ यांनी व्यक्त केली. नुकसान मोठे आणि मदत तुटपुंजी असेल, तर शेतकऱ्यांनी पुढील हंगामाची तयारी करायची तरी कशी? हा सवाल या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची सरसकट आर्थिक मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी आणि संकटात सापडलेल्या शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. शासनाने केवळ घोषणा न करता शेतकरी आणि शेतमजुरांच्या खात्यांत प्रत्यक्ष मदत जमा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या सोबत आ. अमित झनक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीपरावजी सरनाईक, डॉ. श्यामभाऊ गाभणे, चक्रधरभाऊ गोटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमित झनक यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
रिसोड–मालेगावचे आमदार अमित झनक यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडल्या. शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष आर्थिक आधाराची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.



