HomeUncategorizedउद्ध्वस्त सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण..

उद्ध्वस्त सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण..

महसूल-कृषी विभागाचे संयुक्त पथक शेतशिवारात; नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नोंद

राम पाटील वानखेडे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

केनवड: पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने रिसोड तालुक्यातील सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला असून, हाताशी आलेले पीक करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वाशीम जिल्हा आपद्ग्रस्त घोषित झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून महसूल व कृषी विभागाची पथके शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर केनवड व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने भेट देऊन सोयाबीन पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीन पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पीक सुकून गेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
केनवड येथे ग्राम महसूल अधिकारी पियुष तायडे, कृषी सहायक अक्षय टेंगसे, महसूल सेवक विजेंद्र गिरी, महसूल सहाय्यक शाम वानखेडे व अमोल मेटांगळे, तसेच यांच्या पथकाने शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे स्वरूप आदींची प्रत्यक्ष पाहणी करून नोंद घेण्यात आली.
शासनाने वाशीम जिल्हा आपद्ग्रस्त घोषित केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. सर्वेक्षणाच्या आधारे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या पाहणीप्रसंगी शिवाजी बाजड, गणेश प्रल्हाद गोळे, डॉ. विठ्ठल गोळे, विठ्ठल ढेंगळे, मदन ढेंगळे, कैलास ढेंगळे, गोपाल ढेंगळे, कैलास मेसरे, संतोष कुरवाडे, विठ्ठल पारेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular