‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ सोहळ्यात 10 रणरागिणींचा गौरव; ‘ये हृदयीचे ते हृदयी’ व ‘लेट्स इव्हॉल्व्ह’ मासिकाचा शुभारंभ.

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
पुणे : घर, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचा समतोल साधत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला केवळ सन्मान नव्हे, तर कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी मनमुक्त फाउंडेशनने ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ या अनोख्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. पाषाण येथील सी.पी.आर. सभागृहात झालेल्या या हृद्य सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या दहा महिलांचा संघर्ष गौरव करण्यात आला.
“वेदनेला हरवलेस तू, संवेदनेला जागवलेस तू, नियतीलाही नमवलेस तू, यशास कमवलेस तू… शाब्बास! भेदलीस चाकोरी ‘तू’!” या मध्यवर्ती भावनेतून हा सोहळा पुरस्कारापेक्षा कृतज्ञतेचा ठरला.
यावेळी दीपाली बांद्रे, दीपाक्षी शिंगारे, मनीषा गंपले, प्रियंका भिडे, प्रतिभा गुरव, प्रणोती शितोळे, राजश्री चिंतामणी, रेणुका कड, सायली चौगुले आणि विद्या काटकर या दहा रणरागिणींना गौरविण्यात आले. प्रत्येकीचा प्रवास वेगळा असला तरी चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी झटण्याची जिद्द हा त्यांच्या कार्यातील समान धागा असल्याचे अधोरेखित झाले.
दोन नव्या विचारपर्वांची सुरुवात..
या सोहळ्याला दोन नव्या उपक्रमांची जोड मिळाली. दिव्या भोसले लिखित ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘लेट्स इव्हॉल्व्ह – समजून घ्या, चिंतन करा, घडत चला’ या विचारधन मासिकाचा शुभारंभ करण्यात आला. हे मासिक दरमहा प्रकाशित होणार आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना अस्मिता काळे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. पराग कलण, दिव्या भोसले व प्रथमेश भोसले यांनी केले, तर आभार मनीषा कुऱ्हाडे यांनी मानले. यावेळी ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली वी. मं., पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि डॉ. वर्षा कुऱ्हाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आज यशाची व्याख्या पद, पैसा, प्रतिष्ठेपुरती मर्यादित असताना आशेचा किरण होणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे, निराधारांना आधार देणे हेही मोठे कर्तृत्व आहे, या जाणिवेतून उभा राहिलेला ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ हा सोहळा मनमुक्तच्या ‘व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा’ या विचारधारेचा अर्थपूर्ण टप्पा ठरला.



