HomeUncategorizedकपड्यांचे पैसे अनाथांसाठी; रोहित खडसेने जपली माणुसकी!

कपड्यांचे पैसे अनाथांसाठी; रोहित खडसेने जपली माणुसकी!

खडसे कुटुंबीयांचा संस्काराचा आदर्श; स्नेहच्छाया अनाथ आश्रमात फुलवले हास्य…

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : वाढदिवस म्हटला की डीजे, केक आणि नव्या कपड्यांची धूम असते. पण या धामधुमीत रिसोड येथील एका तरुणाने माणुसकीचा वेगळा अर्थ समजावून दिला आहे. हा तरुण म्हणजे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा रिसोड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनोद विठोबा खडसे यांचे चिरंजीव रोहित विनोद खडसे.
रोहितच्या वाढदिवसानिमित्त आई-वडिलांनी त्याला नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले होते. रोहितने आपल्यासाठी ड्रेस घेतला आणि उरलेले पैसे स्वतःच्या मौजमजेसाठी न वापरता, एक अनोखा संकल्प केला.
रोहितने त्या वाचलेल्या पैशातून स्नेहच्छाया परिवार अनाथ आश्रम येथील गरजू आणि वंचित बालकांसाठी ताजी फळे खरेदी केली. आश्रमात जाऊन त्या चिमुकल्यांसोबत वेळ घालवत, त्यांच्या हातात फळे देत त्याने आपला वाढदिवस साजरा केला. फळ मिळताच त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर जे निरागस हास्य उमलले, तेच रोहितसाठी वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट ठरले.

संस्काराची शिदोरी – कृतीतून आदर्श…

हा काही पहिलाच उपक्रम नाही. यापूर्वीही रोहितने आपला वाढदिवस महाराष्ट्राच्या शूरवीरांना वंदन करून साजरा केला होता. आई-वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारांची शिदोरी तो केवळ बोलण्यात नाही, तर कृतीतून जपत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
यावेळी बोलताना खडसे कुटुंबीय म्हणाले, “स्वतःचा आनंद साजरा करताना दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे, हीच खरी माणुसकी. अनाथ मुलांसोबत घालवलेला वेळ हा आमच्यासाठी समाधान देणारा होता.”

स्नेहच्छाया परिवाराचे कार्य कौतुकास्पद.

 स्नेहच्छाया परिवार अनाथ आश्रम ही संस्था गरजू, वंचित मुलांना निवारा, शिक्षण, प्रेम आणि उज्ज्वल भविष्याची संधी देण्याचे मोलाचे कार्य करत आहे. अशा संस्थेसोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाल्याबद्दल खडसे कुटुंबीयांनी संस्थेचे आभार मानले.
 रोहितच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत असून, तरुण पिढीपुढे त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular