मोठ्या प्रकल्पातील पाणी कारखाने, उद्योगांना मिळते, मग शेतकऱ्यांचीच अडवणूक का ?

आकाश पाटील दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : एकीकडे वरुणराजाने पाठ फिरवल्याने खरीप हातातून गेलं, आणि दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता, ल.पा. जि.प. वाशिम यांनी दि. ०२/१०/२०२६ रोजी एक सक्त आदेश (जा.क्र/लसिवि/जिप/वा/E/3683175/26) काढून जिल्ह्यातील ४९९ तलावांमधून होणारा सर्व प्रकारचा पाणी उपसा (अवैध उपसा तसेच तात्पुरते रद्द केलेले परवाने) तात्काळ रोखण्याचे फर्मान सोडले आहे.काय आहे फतव्यात?एल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर तलावातील पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी व अत्यावश्यक गरजांसाठी आरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे कारण देत, परवानाधारकांचे परवाने सुद्धा तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द करण्यात आले आहेत. आदेशानुसार आता तलावातून कोणत्याही प्रकारचा उपसा करण्यास परवानगी नाही. विनापरवाना उपसा बेकायदेशीर असून ज्यांच्याकडे यापूर्वी परवाना होता, त्यांनीही परवाने रद्द असताना उपसा केल्यास तो अवैध उपसा समजण्यात येईल. पंप,मोटर,इंजिन/पाईपलाईनद्वारे होणारा उपसा दिसल्यास पंप, मोटर, पाइप जप्त करून कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश आहेत.यासाठी गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक यांची गावस्तरीय दक्षता समिती गठीत करून प्रत्येक सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वाशिम यांनी दिला आहे.शेतकऱ्यांची पंचाईत दुष्काळात तेरावा महिना ! या निर्णयाने उपसा सिंचनावर अवलंबून असलेल्या शेकडो शेतकऱ्यांची झोप उडाली असून ,आरक्षित पाणी कुणासाठी..? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासन म्हणते पाणी पिण्यासाठी आरक्षित. पण प्रत्यक्षात याच तलावातील पाणी गावात नळाद्वारे पोहोचतच नाही. मग आरक्षित पाणी तलावातच आटून जाणार का? असा सवाल सुद्धा शेतकरी विचारत आहेत.खरीप हातातून गेला,आता बागायती शेती पण धोक्यात. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून केळी, भाजीपाला, फळबागा लावल्या आहेत. उपसा बंद झाल्यास बागा जळून जातील. खरीप गेलं, आता बागायती सुद्धा घालवायची का?दुजाभाव का? मोठ्या प्रकल्पातील पाणी कारखाने, उद्योगांना मिळते, मग छोट्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी का पळवले जात आहे? शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.शेतकऱ्यांची मागणी.शासनाने सरसकट उपसा बंद करण्याऐवजी, तलावात उपलब्ध पाण्याचे वास्तविक ऑडिट करावे. पिण्यासाठी लागणारे पाणी वजा जाता, उर्वरित पाणी शेतीसाठी नियंत्रित वेळेत द्यावे. अन्यथा हा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी तेरावा महिना ठरेल.



