HomeUncategorizedवाशिम जिल्ह्यातील कृषी विभागात महाघोटाळा.

वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागात महाघोटाळा.

मंगरूळपीर तालुक्यातील चोरद येथील अनंता घुगे यांची कृषिमंत्र्यांकडे तक्रार.

सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन.

दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्ह्याच्या कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया या योजनेतील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या घटकाच्या अंमलबजावणीत प्रचंड अफरातफर झाली असून हजारो लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचे आधार सलग्न बँक खात्यात DBT द्वारे जमा करावयाचे होते असे तब्बल ४६ लाख रुपये अनुदान हे जिल्ह्यातील केवळ सहा शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जमा केले असल्याची तक्रार चोरद येथील अनंता घुगे यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय यांच्याकडे केली आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता मंत्रीमहोदय जिल्हादौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार केली असल्याचे अनंता घुगे यांनी सांगितले आहे.
     माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीतून सदर धक्कादायक प्रकार उघड झाला असल्याची माहिती घुगे यांच्याकडून देण्यात आली आहे. शेतकरी तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनंता घुगे यांनी याबाबत  वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर तक्रार दाखल केली आहे. याबाबत पालकमंत्री व कृषी मंत्री भरणे यांनी दोषींना निलंबित करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती तक्रारदार यांनी दिली आहे.
सदर तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,ज्वारी पिकासाठी असलेल्या खत तूर पिकाला दिल्याचे दाखवून शेतकऱ्यांचे हक्काचे अनुदान परस्पर हडपण्यात आले असून,एकाच दिवशी २० जून २०२४ रोजी १४५८५ शेतकऱ्यांनी खते व औषधाची यवतमाळ येथून खरेदी केल्याचे दाखवून मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीत केला आहे.माहितीच्या अधिकारात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मागितली असता,जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिली नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

बॉक्स.
*बॅटरी चलित फवारणी पंप व नॅनो युरिया आणि डीएपी वाटपातही अफरातफर*
   मंगरूळपीर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना वाटपासाठी आलेले हजारो बॅटरी चलित फवारणी पंप  तसेच हजारो लिटर द्रवरूप नॅनो युरिया व नॅनो डीएपी खत वाटपातही प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांनी अफरातफर केली असून, वाटपाची कुठलीही माहिती अधिकारात अर्ज करूनही माहिती देण्यात येत नाही. असा आरोप सुद्धा तक्रारदार यांनी केला आहे. परिणामी लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाकल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मंडळ कृषी अधिकारी आसेगाव  यांना तालुका कृषी अधिकारी व कृषी सेवा केंद्र तपासणी असे तीन पदभार जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी यांनी वरदहस्त ठेवून दिले असल्याचेही घुगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


*लाखो रुपयांची होतेय हप्ता वसुली*
चोरद येथील अनंता घुगे यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महिन्याला लाखो रुपयांचा कृषी सेवा केंद्राकडून हप्ता वसुली करण्यात येत आहे.
असेच प्रकरण धाराशिव जिल्ह्यात उघड होऊन पंधरा कृषी अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची घटना ताजी असताना, वाशिम जिल्ह्यातीलही धाराशिव सारख्याच प्रकरणाची आपण दोषी अधिकारी यांना निलंबित करून चौकशी करणार का? असा थेट सवाल घुगे यांनी कृषी मंत्री  भेटीत केला आहे .पालकमंत्री व कृषी मंत्री यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती अनंता लक्ष्मण घुगे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular