जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, शाळा समिती व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम – महिला व भजनी मंडळाचा मोठा सहभाग.

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, बाळखेड येथील गणपती विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या थाटामाटात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातून टाळ, मृदंग व लेझीमच्या तालावर शाळेतील चिमुकल्यांनी व गावातील भजनी मंडळींनी भव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. या मिरवणुकीत गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. _”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”_ च्या जयघोषात संपूर्ण बाळखेड गाव दुमदुमून गेले होते. शाळेने जपलेली ही सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला.



