🔆 मग कोरड्या दुष्काळाचे मोजमाप नेमके कशावर ?
🔆 ट्रिगर – एक या तांत्रिक निकषात जिल्ह्यातील तीन तालुके वगळले.
🔆 जिल्ह्यातील तीन तालुके वगळल्याने संभ्रम वाढला.
🔆 समाज माध्यमावरील यादी ही अंतिम यादी नसल्याचे स्पष्ट.
कोरडा दुष्काळ विशेष..
वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :पावसाने पाठ फिरवली आणि जिल्ह्यातील जवळपास सहाही तालुक्यातील पिके पावसाअभावी करपून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम डोळ्यांसमोर उध्वस्त झाला असताना, ट्रिगर – एक ही तालुका निहाय दुष्काळी यादी समाज माध्यमावर फिरत असून, रिसोड, वाशिम आणि मालेगांव या तीन तालुक्याची नावे नसल्याने शेतकरी व स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ट्रिगर – एक च्या नावाने समोर आलेल्या तालुकानिहाय दुष्काळग्रस्त यादीने वाशिम जिल्ह्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे. या यादीत करंजा, मंगरूळपीर आणि मनोरा या तालुक्यांचा समावेश दिसत असतांनाच तीन तालुक्यांची नावे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ट्रिगर – एक म्हणजे अंतिम दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी नव्हे; ही बाब समजून घेणे खुप महत्त्वाचे आहे.
ट्रिगर – एक म्हणजे अंतिम निर्णय नव्हे !
दुष्काळ मूल्यांकन प्रक्रियेत पावसातील तूर ( RF Dev ) आणि सलग चार आठवडे पावसाचा खंड ( Dry Spell ) या सारख्या निकषांच्या आधारे ट्रिगर – एक निश्चित केला जातो. त्यानंतर दुष्काळाची तीव्रता तपासण्यासाठी पुढील प्रभाव निर्देशक आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे ट्रिगर – एक मध्ये एखाद्या तालुक्याचे नाव नसणे म्हणजे त्या तालुक्यात दुष्काळ नाही किंवा तो तालुका अंतिमतः मदतीपासून वंचित राहणार असा सरळ अर्थ येत नाही. कारण महाराष्ट्राच्या दुष्काळ मूल्यांकन प्रक्रियेत ट्रिगर – एक नंतर पुढील मूल्यांकनाची तरतूद असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे यादीत नावे नसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंतिम दुष्काळी यादी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत संयम बाळगावा अशी अपेक्षा काही सुज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
*रिसोडचा प्रश्न मात्र वेगळा..*
रिसोड तालुक्यात पावसातील खंड, खरीप पिकांची अवस्था आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न स्थानिक पातळीवर सातत्याने चर्चेत आहे. या गंभीर प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी टाहो फोडल्यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कार्यालय सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार,खासदार, युवा नेते, शेतकरी संघटनेचे नेते सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या पिकांची अवस्था पहात आहेत. दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. तरी सुद्धा ट्रिगर – एक च्या यादीत रिसोडचे नाव नसल्याने, ” तालुक्याची दुष्काळसदृश परिस्थिती या तांत्रिक निकषात का आली नाही ? हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या या यादीकडे अंतिम सरकारी दुष्काळ घोषणा म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. कारण या बाबत कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.



