विदर्भाच्या शैक्षणिक राजकारणात ‘ पैसा ‘ की ‘ ‘स्वाभिमान ‘?
माविआ – महायुतीत बंडखोरीची ठिणगी !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी २९ सप्टेंबरला अधिकृत अधिसूचना निघणार असली, तरी त्यापूर्वी या मतदारसंघातील राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींनी उच्चांक गाठला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून, राजकीय वातावरण तापत चालले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाल्यामुळे विदर्भाच्या शैक्षणिक राजकारणात ‘ पैसा ‘ की ‘ ‘स्वाभिमान ‘? या प्रश्नाचे उत्तर निकालांतीच मिळणार आहे.
२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी २९ सप्टेंबरला अधिकृत अधिसूचना निघणार असली तरी, त्यापूर्वीच या मतदारसंघातील राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींनी उच्चांक गाठला आहे. २०२० च्या निवडणुकीत ‘ पैठणी ‘ आणि धनशक्तीच्या जोरावर प्रस्थापितांना धूळ चालणाऱ्या या मतदारसंघात यंदाची लढाई राजकीय पक्षापेक्षा अंतर्गत बंडखोरी आणि शिक्षकांच्या अस्तित्वाची बनली आहे. महायुती मधील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा अंतर्गत कलगीतुरा आणि महाविकास आघाडीचा ‘मास्टर स्ट्रोक ‘ यामुळे यंदाची निवडणूक ऐतिहासिक वळणावर येऊन ठेवली आहे.
महायुतीचा पेच – एकाच म्यानात दोन तलवारी
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी २०२० मध्ये अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणात आता हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.ॲड किरणराव सरनाईक हे महायुतीकडून उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जात असताना, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही आपली उमेदवारी जाहीर करून महायुतीसमोर उघड आव्हान उभे केले आहे. पक्ष तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा इशारा देशपांडे यांनी दिल्याने महायुतीमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. एकाच पक्षात असलेल्या या दोन बड्या नेत्यांचे अंतर्गत वाद मिटवणे हे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
माविआची खेळी – काँग्रेसचा ‘वारसदार कार्ड ‘ आणि ठाकरेंचा ‘ शिक्षक चेहरा ‘
या निवडणुकीची दुसरी बाजू पाहिली तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत अत्यंत हुशारीने मोहरे चालवले असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.काँग्रेसने या मतदारसंघात मोठी खेळी खेळत एका माजी मंत्राच्या कन्येला म्हणजेच, आदिती पोहरे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे. यामुळे मतदार संघात घराणे शाही आणि धनशक्तीचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र काँग्रेस या जागेवर आपला भक्कम दावा सांगत आहे. त्यातच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मविआ मधील जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. कडू यांच्या रूपाने ठाकरेंकडे शिक्षण क्षेत्रातील तळागाळातील चेहरा असल्याने महाविकास आघाडीमध्येही अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे.
प्रलोभन की स्वाभिमान ? शिक्षकांचा थेट सवाल !
राजकीय पक्षांचे डावपेच पाहता सामान्य शिक्षकांमध्ये यंदा राजकीय पक्षांच्या या खेळी बद्दल तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत झालेल्या ‘ पैठणी ‘ आणि पैशाच्या वाटपामुळे या मतदारसंघाची बदनामी झाल्याची भावना सुज्ञ शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. ” आम्हाला प्रलोभने नकोत, तर सभागृहात आमचे प्रश्न पोटतिडके ने मांडणारा अभ्यासू येता हवा !” असा सूर उमटत आहे. ज्या उमेदवाराला ‘ स्कूल कोड ‘ ‘जीआर ‘ आणि शैक्षणिक नियमांची खडानखडा माहिती आहे त्यालाच पसंती देण्याचा निर्धार शिक्षक मतदारांनी केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे रखडलेले प्रश्न आणि शिक्षक भरतीतील पारदर्शकता हेच यंदाचे खरे कळीचे मुद्दे ठरणार आहेत.
निवडणूक २०२६ – महत्वाचे टप्पे__
🔆 अधिसूचना व अर्ज प्रक्रिया २९ सप्टेंबर
🔆 अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर
🔆 मतदान तारीख २३ ऑक्टोबर २०२६
🔆 मतमोजणी व निकाल २७ ऑक्टोबर २०२६
बंडखोरीच ठरणार निर्णायक !
अमरावती शिक्षक मतदार संघाची २०२६ ची लढाई केवळ पक्षविरुद्ध पक्ष राहिलेली नाही ती आता पैसाविरुद्ध शिक्षकांचा स्वाभिमान आणि अंतर्गत बंडखोरीचे व्यवस्थापन या सूत्रावर येऊन थांबली आहे महायुती मधील शिंदे गटाच्या दोन नेत्यांमधील अंतर्गत जर वेळेत मिटला नाही तर मत विभाजनाचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या विशेषतः काँग्रेस किंवा ठाकरे गट उमेदवाराला मिळणे अटळ आहे प्रलोभनांना धुडकावून शिक्षक आपल्या पवित्र मताचा अधिकार कसा वापरतात यावरच विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्राचे भवितव्य अवलंबून असेल.



