दोन लाख रुपयांच्या आतील पिककर्ज माफ झालेले असतांनाही व्याज भरण्याचा तगादा का ?
युवक काँग्रेसचे राहुल बोडखे यांचा बँकेला सवाल !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यासह, संपूर्ण राज्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली वावरत आहेत. खरिपातील पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असून, अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीची महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांच्या आतील पिककर्ज माफ करण्यात आले असतांनाही रिसोड तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज भरून घेतल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या गंभीर प्रकरणाबाबत युवक काँग्रेसचे राहुल बोडखे यांनी थेट बँकेत जाऊन बँक व्यवस्थापनाला जाब विचारून या खळबळजनक प्रकाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. दुष्काळी परिस्थितीने कंबरडे मोडलेल्या बळीराजाकडून अतिरिक्त व्याज वसुली केली जात असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून दोन लाख रुपयांच्या आतील पीककर्ज माफ झालेले असतानाही, बँक ऑफ इंडियाकडून शेतकऱ्यांकडे अतिरिक्त व्याजाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बँकेत धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
राजाराम कांगणे यांचे ₹९३,००० मुद्दल व व्याजासह ₹१,२५,००० कर्ज माफ झालेले असतानाही, ३१ मार्चनंतरच्या व्याजापोटी ₹१२,५०० रुपये भरून घेतल्याची तक्रार समोर आली. तसेच दत्तात्रय बाकल यांच्याकडूनही व्याजापोटी ₹५,००० रुपये भरण्याची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आले.
एकीकडे वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना, दुसरीकडे बँकांकडून कर्जमाफीच्या संदर्भात अतिरिक्त वसुलीचा तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या नियमांनुसार पात्र शेतकऱ्यांकडून चुकीची वसुली होत असेल, तर ती तात्काळ थांबवून संबंधित रकमेची चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
तसेच, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यासाठी एक-एक महिना टाळाटाळ केली जात असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देणे ही बँकांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून बँक ऑफ इंडियावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी मा.जिल्हाधिकारी साहेबांकडे करण्यात आली.

” शासनाने कर्जमाफी दिलेली असताना शेतकऱ्यांकडून व्याजापोटी पैसे वसूल करणे अन्यायकारक आहे.बँक ऑफ इंडियाने व्याजापोटी घेतलेली रक्कम संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ परत करावी.दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी त्रास देऊ नये.लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या ह्या बँकेविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे !”
____ राहुल बोडखे
( युवानेते, युवक काँग्रेस वाशिम )



