HomeUncategorizedश्री विठ्ठल विद्यालयाचा कुस्तीपटू राज्यस्तरावर!

श्री विठ्ठल विद्यालयाचा कुस्तीपटू राज्यस्तरावर!

सचिन शिंदेची दमदार झेप, आता नजर महाराष्ट्र केसरीवर.

वसंत खडसे

दैनिक लोकतंत्र न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बातमी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत झालेल्या अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री विठ्ठल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन भारत शिंदे याने दमदार कामगिरी करत राज्यस्तरावर धडक मारली आहे.
वयोगट १७ वर्षांखालील, ११० किलो वजनी गटात खेळताना सचिनने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.

वडील आणि भावाची प्रेरणा

आपल्या यशाचे श्रेय देताना कुस्तीपटू सचिन म्हणाला, _”या यशामागे माझे वडील भारत शिंदे आणि माझा भाऊ, पैलवान विदर्भ केसरी विजय शिंदे यांची खूप मोठी प्रेरणा आहे. त्यांच्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो.” भविष्यात महाराष्ट्र केसरी बनण्याचा मनोदय त्याने यावेळी व्यक्त केला.
     या सत्कार समारंभात शाळेचे प्राचार्य संजय बाजड यांच्या हस्ते सचिनला शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य बाजड म्हणाले, _“सचिनच्या यशामुळे शाळेचा मान नक्कीच उंचावला आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”_ त्यांनी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
     या कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक (मुंबई) श्री. देविदासजी नागरे, वरिष्ठ शिक्षक श्री. एम. बी. नागरे सर, वरिष्ठ लिपिक दत्तराव इंगळे तसेच सचिनचे वडील भारत शिंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular