नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा!— तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर

वसंत खडसे दैनिक लोकतंत्र वाशिम : जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या वतीने दि. 1 आगष्ट ते 7 आगष्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन कारण्यात आले आहे.जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या संकल्पनेतून, उप विभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात आणि तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात रिसोड तालुक्यातील 8 मंडळात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि. 4 आगष्ट 2025 रोजी मोप मंडळातील मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदर शिबीर आयोजित केले आहे. याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी सुभाषराव जाधव यांनी दिली आहे. विविध योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी व महसूल संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खालीलप्रमाणे मंडळनिहाय महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महासराजस्व विशेष समाधान शिबिर संपन्न होणार आहे. दि. 4 आगष्ट रोजी मोप मंडळातील मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालय,रिसोड मंडळातील करडा येथे गजानन महाराज मंदिर सभागृह, कवठा मंडळातील चिखली येथे खंडोबा महाराज मंदिर सभागृह, गोवर्धन येथील रेणुका माता मंदिर सभागृह, आसेगाव पेन येथे गजानन महाराज मंदिर सभागृह, केनवड येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह, वाकद मंडळातील धोडप बु. येथील गजानन महाराज मंदिर सभागृह आणि भर जहांगीर येथे गणेश मंदिर सभागृह आदी ठिकाणी सदर शिबीर पार पडणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी श्री. जाधव यांनी दिली आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा — प्रतीक्षा तेजनकर
ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, विध्यार्थी व महिलांना रहिवासी, उत्पन्नाचे व जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या विविध योजना आदी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यात अनेक वेळा संबंधित कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसतात त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते. परिणामी वेळ व पैसा नाहक वाया जातो. सर्व सामान्य नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून महसूल सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान विशेष शिबिराचे आयोजन मंडळनिहाय करण्यात आले आहे. या संधीचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा..! असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे.
