सतत धार पावसामुळे नदी, नाल्यांना महापूर.

वाशिम जिल्ह्यात जनजीवन विस्कळित.
वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने यावर्षी पावसाळा वेळेत सुरू होण्याचे संकेत दिले होते. त्या अनुषंगाने जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी सुरू केली. मात्र पेरणी झाल्या नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी केलेले शेतकरी डोळ्यात पाणी आणून आभाळाकडे पाहत होते.तर पेरणी राहिलेले शेतकरी पेरणीसाठी डोळ्यात पाणी आणून पावसाची प्रतिक्षा करत होते. अखेर दि.२५ जून बुधवारच्या रात्री पासुन पावसाचे आगमन झाले आणि २६ जून गुरुवार पर्यंत दिवसभर पावसाची सतत धार सुरूच होती. परिणामी जिल्ह्यातील अनेक भागात नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळित झाले.तर नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. गेल्या दोन हप्त्यापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात अखेर पाऊस पडल्यानंतरही पाणीच पहावयास मिळत आहे.
गेल्या चार – पाच वर्षांतील नैसर्गिक संकटांचा आढावा घेतला तर निसर्ग राजाची बळीराजावर सतत अवकृपाच होत असल्याचे स्पष्ट होते. कधी अतिवृष्टी, तर कधी अल्पवृष्टी, अवकाळीचे थैमान, महापूर आदी अनेक संकटांनी बळीराजाची दैनावस्था करून टाकली असल्याचे सर्वश्रुत आहेच. तीच अवस्था काल झालेल्या सतत धार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द, कुकसा, आंचळ, जोगेश्वरी, नेतन्सा, कोयाळी, मांगुळ झनक, शेलगाव ( राजगुरे ) मसला पेन आदी अनेक गावांना परिसरातून वाहणाऱ्या कांचनगंगा, उतावळी नदी व ईतर लहानमोठ्या नदी नाल्यांना आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला असल्याची माहिती सबंधित गावकऱ्यांनी दिली आहे. तर वाशिम – मालेगांव- मेहकर या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन अनेक प्रवाशांना पुराचे पाणी कमी होईपर्यंत ताटकळत राहावे लागले. तर रिसोड – मेहकर राज्यमार्गावरील महागावच्या पुढे असलेला पुल धुव्वाधार पावसामुळे खचून गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी सदर पुल अत्यंत धोकादायक झाला असून कुठलेही चार चाकी वाहन त्या पुलावरून टाकल्यास अपघात होण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीकडून वर्तविण्यात येत आहे. तर काही भागात पाण्यामुळे मुख्य विद्युत वाहिनीचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावातील विज पुरवठा खंडीत झाला असल्याची माहिती हाती आली आहे. पेरणी झालेल्या शेतात पाणी साचल्याने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले असून या पावसाच्या कहराने बळीराजा हवालदिल झाला आहे.
पिंप्री सरहद्द वासियांनी घातला माणुसकीचा नवा आदर्श.
वाशिम – मालेगांव – मेहकर या महामार्गावरील जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पिंप्री सरहद्द या गावाला कांचनगंगा आणि उतावळी नदीच्या महापुराने वेढले, तेथील ग्रामस्थांचा जीव धोक्यात असताना सुद्धा सदर गावकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. पिंप्री वासियांचा हा स्तुत्य आदर्श इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशा प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दैनिक लोकतंत्रशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत.

तब्बल १९ वर्षानंतर महापुराची पुनरावृत्ती.
सन २००६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वातमोठ्या पैनगंगेसह, तीची उपनदी असलेल्या कांचनगंगा नदीला व ईतर लहानमोठ्या नदी नाल्यांना महापूर आला होता. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडून त्यात शेतकऱ्यांसह, रस्त्यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. तेंव्हापासून तब्बल १९ वर्षानंतर काल झालेल्या सतत धार पावसामुळे त्या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली असल्याची आठवण अनेक नागरिक सांगत आहेत.
