वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, पक्षाला नवी धार मिळणार

दैनिक लोकतंत्र
वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वाशिम जिल्हाध्यक्षपदी रिसोड तालुक्यातील सर्वांना सोबत घेऊन चालणारे युवा नेतृत्व अमित पाटील खडसे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सदर नियुक्ती केली आहे. सर्वसमावेशक असं युवा नेतृत्व जिल्हयाला लाभल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून रिसोड, मालेगांव येथे जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या महत्त्वाच्या नियुक्तीमुळे पक्षाला नवी धार मिळणार असल्याचे राजकीय तज्ञ बोलत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांचे सुपुत्र असल्याने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित पाटील खडसे यांना आपसूकच राजकीय वारसा आहे. त्यांच्या नेतृत्वात अमित पाटील प्रचंड मतांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तद्वतच बालाजी सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून अमित पाटील यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. शिवाय जिवन विकास शिक्षण संस्थेचे ते सचिव असून शैक्षणिक क्षेत्रात ते मोलाची कामगिरी बजावत आहेत. स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अमित पाटील खडसे हे शाहू, फुले,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे साहजिकच अठरा पगड जातीधर्मांच्या लोकांसोबत त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारा, पक्षाची ध्येयोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणारा आणि शेतकऱ्यांचा आवाज असलेला चेहरा जिल्हाध्यक्षपदी आल्याने पक्षाला नवी धार मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांना घेऊन वाशिम जिल्ह्यात पक्षाला नवसंजीवनी देणे हे माझे पहिले कर्तव्य राहील. शेतकरी,कष्टकरी, युवक आणि महिला व गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित पाटील खडसे यांनी दैनिक लोकतंत्रशी बोलतांना दिली.
