HomeUncategorizedज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

साई नगरीत ६ जानेवारीला होणार वितरण सोहळा.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आणि आधुनिक पत्रकारितेचे पितामह, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे यांचे नाव जाहीर झाले आहे. सदर पुरस्काराची घोषणा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून ६ जानेवारी रोजी साई नगरी शिर्डी येथे दिमाखदार सोहळ्यात पत्रकार बानोरे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारदिनाच्या औचित्यावर हा पुरस्कार सोहळा पार पडत असल्याने या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिभावान मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील पत्रकार, लेखक आणि माहिती अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार असल्याने हा वितरण सोहळा माध्यम क्षेत्रातील मानाचा उत्सव ठरणार आहे.
रिसोड येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन बानोरे हे विधायक पत्रकारितेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहेत. पत्रकाराला आवश्यक असणारी चौकस वृत्ती, नाविन्याचा सतत शोध आणि घटनेचा अचूक वेध घेत वृत्तांकन करणे ही त्यांच्या पत्रकारितेची विशेषतः आहे. जवळपास तीन दशकांपासून प्रामाणिकता, पारदर्शकता आणि सत्यासाठी निडरपणे वृत्तांकन करत त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गरिमा कायम जोपासली आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या लेखणीला तलवारीची ताकद देत, पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य अव्याहतपणे केले आहे आणि आजही करत आहेत. एका आघाडीच्या दैनिकात काम करत असताना आपल्या शहरातील स्थानिक समस्यांना अधिकाधिक वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःचे पिंगळाक्षी एक्सप्रेस वृत्तपत्र सुरू केले आहे. पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना त्यांनी स्थितप्रज्ञ,ध्येयवादी, समन्वयवादी आणि एक अजातशत्रू पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक कार्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या महान कार्याची योग्य दखल घेत त्यांना दर्पण जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक अद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन म्हणून ६ जानेवारी हा “पत्रकार दिन” दरवर्षी साजरा करण्यात येतो. आणि या दिवसाचे आणखी विशेष महत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ” दर्पण ” ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. अशा अतिविशेष दिवसाच्या शुभपर्वावर रिसोड येथील पत्रकार गजानन श्रीराम बानोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही केवळ रिसोड तालुक्यासाठीच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संत नगरी शिर्डी येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular