जिल्हाध्यक्षपदाची धुरा गजानन खंदारे यांच्या खांद्यावर, तर जिल्हा सचिवपदी रमेश मुंजे.

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून, कोणत्याही क्षणी पुन्हा नव्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून खांदेपालट केले आहेत. जिल्हा प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळणारे गजानन खंदारे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा टाकण्यात आली असून, जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेड ही गेली अनेक वर्षे एक विचारधारा म्हणून समाजाच्या प्रत्येक स्तरात रुजलेली आहे. संभाजी ब्रिगेडचा विचार आज अशा एका गावात किंवा घरातही पोहोचलेला नाही असे ठामपणे म्हणता येत नाही. सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी लढणारी, शेतकरी-मजुरांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारी अशी ही चळवळ आता राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे.
सत्तेची चावी हातात असली तरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे अधिक प्रभावीपणे शक्य होते, या धोरणात्मक विचारातून संभाजी ब्रिगेडने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नवीन रणनीती आखली आहे. या रणनीतीत महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा प्रवक्ता गजानन खंदारे यांच्याकडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी खंदारे यांना सोपवली.
या निर्णयाबाबत विभागीय अध्यक्ष गजानन भोयर म्हणाले की, “वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी गजानन खंदारे नक्कीच सक्षमतेने पार पाडतील, यात शंका नाही.
नगरपरिषद निवडणुकांचा धुरळा बसत असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अशा पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करून आगामी निवडणुकीसाठी सज्जता दर्शवली आहे.
युतीसाठी चर्चेला सुरुवात,
इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू
संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवणार आहे. विविध राजकीय पक्षांशी युतीबाबत बोलणी सुरू असून इच्छुक उमेदवारांची चाचणी देखील गतीने केली जात आहे. संघटनाची बांधणी, पक्षाची भूमिका आणि निवडणूक व्यवस्थापन पाहता खंदारे यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर
जिल्हा सचिव पदाची जबाबदारी रमेश मुंजे मंगरूळपीर यांना देण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर होते.
जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, विभागीय प्रवक्ता ॲड. हिरामण मोरे, विभागीय उपाध्यक्ष नितेश पोहकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, राधेशाम शिरसाठ, संतोष भिसडे, राहुल सोमटकर, विष्णु भोयर, मालेगाव तालुका अध्यक्ष विनोद जाधव, विजय जुनजारे, समाधान शिंदे, नितीन जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
