धाराशिव मधील नांदगाव जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम : राजकीय क्षेत्रात अनेकजण पदाच्या भरवशावर स्वतःचे नाव मोठे करून घेतात, समाजात आपली ताकद वाढवतात आणि संधी मिळताच दुसऱ्या पक्षात लँड होतात. अशी कित्येक उदाहरणे आजमितीस सर्वश्रुत आहेत. मात्र त्याला अपवाद ही कित्येकजन आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मुळे परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. तोच वारसा पुढे सुरू ठेवणारे उच्चविद्याविभूषित गौरीशंकर मुळे यांनी नांदगाव जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवावी असा आग्रह सर्व सामान्य जनता करीत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाची तत्व, ध्येयधोरण तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणारे गौरीशंकर मुळे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून पदवीधर असलेले गौरीशंकर मुळे हे अभ्यासू, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य असणारे युवा नेतृत्व म्हणून धाराशिव जिल्ह्यात सुपरिचित आहेत. तत्वाशी व पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मुळे परिवाराची धाराशिव जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या परिवारातील कोणताही सदस्य कुठल्याही निवडणुकीत उमेदवार असला तर ती निवडणूक एकतर्फी ठरते असा आजवरचा अनुभव असल्याचे नांदगाव सर्कल मधील सामान्य लोक सांगतात. त्याचे कारणही साजेशे असेच आहे, संसदीय लोकशाही व्यवस्थेची जपणूक व जोपासना तद्वतच धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारांची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनात वावरतांना सर्वधर्मसमभावाची जोपासना करत या कुटुंबाने आठरा पगड जातीधर्मातील लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. तीच पत या परिवाराची काँग्रेस पक्षात सुद्धा अबाधित आहे. उच्चविद्याविभूषित असलेले गौरीशंकर मुळे यांनी किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात करून राजकीय वाटचालीस सुरुवात केली होती. त्यांच्या उत्तम कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर किसान काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. व सद्यस्थितीत ते राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या संशोधन आणि युवा धोरण विभागाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. परिणामी काँग्रेस पक्षात त्यांची वैक्तिक चांगली पकड निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी श्रेष्ठींकडे कुठल्याही संदर्भात मत व्यक्त करायचं झाल्यास कोणाही मध्यस्थीची गरज भासत नाही. त्यातच नांदगाव जिल्हा परिषद गट प्रामुख्याने मुळे यांचे वर्चस्व असलेला गट आहे. आतापर्यंत येथून जेवढ्या लढती झाल्या त्या काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच झाल्या आहेत. आणि भाजपला सडेतोड टक्कर देणारा उमेदवार म्हणून गौरीशंकर मुळे यांचे नाव समोर येत आहे. पक्षाच्या विविध पदावर काम करीत असताना मुळे यांनी सर्वसामान्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे गौरीशंकर यांनी काँग्रेसकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघात निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्राचा खुप मोठा अनुभव आहे. म्हणूनच ते संभाव्य नव्हे; तर काँग्रेसचे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या फेऱ्यात अशा उमद्या नेतृत्वाचे तिकीट काटल्या जायला नको ! अशी अपेक्षा नांदगाव सर्कल मधील सामान्य लोक व्यक्त करीत आहेत.
तीन पिढ्यांचा वारसा, हाच विश्वासाचा आरसा..
धाराशिव जिल्ह्यातील एक विश्वासू घराणे म्हणून मुळे परिवाराची ओळख आहे. गौरीशंकर मुळे यांचे आजोबा तब्बल ४० वर्षे सरपंच होते. तर वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांच्या वडिलांनी सुद्धा सहकार क्षेत्रात विविध पदे भूषविली आहेत. शेतीनिष्ठ असलेल्या या परिवाराने शेतकरी हिच जात, आणि शेती हाच आपला धर्म मानला आहे. त्यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून मुळे परिवाराचे सर्वांसोबतच स्नेहाचे व आपुलकीचे सबंध आहेत. तोच वारसा गौरीशंकर मुळे हे पुढे चालवित आहेत. त्यामुळे गौरीशंकर यांना लाभलेला तीन पिढ्यांचा वारसा हाच त्यांच्या राजकीय जीवनाचा आरसा ठरणार आहे.
