HomeUncategorizedशोषित, पिडित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी रणशिंग फुंकणार..!

शोषित, पिडित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी रणशिंग फुंकणार..!

चिंचाबा भर सर्कलमधून सौ. संगीताताई अशोकराव सानप निवडणूक लढवणार..

दिवाळीनंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय आतिषबाजी होणार !

वसंत खडसे
दैनिक लोकतंत्र
वाशिम :
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सर्वांनाच आता निवडणूक घोषणेची प्रतीक्षा लागली आहे. त्या अनुषंगाने सर्वच इच्छुकांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली असून जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोड तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले जात आहे. तालुक्यातील चिंचाबा भर सर्कल सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटला असल्याने येथून अनेक इच्छुक उमेदवार आपले भाग्य अजमावण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती हाती येत आहे. या बाबत अधिक माहिती घेतली असता,गेल्या २५ ते ३० वर्षापासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले व संघाशी नाळ जुळलेले अशोकराव सानप यांनी चिंचाबा भर सर्कलमधून रणशिंग फुंकणार असल्याचा इशारा दिला आहे. सदर गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे सानप यांच्या धर्मपत्नी सौ. संगीताताई अशोकराव सानप येथून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सानप यांनी सिटीन्यूज सुपरफास्टशी बोलतांना दिली आहे.
पुढे बोलतांना सानप म्हणाले की, सामाजिक कार्य, समाजसेवा आणि राजकारण हे परस्पर संबंधित घटक असून सामाजिक कार्य ही राजकारणाची पहिली पायरी मानली जाते. कारण राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्याने सामाजिक कार्य करण्यास अधिक बळ मिळते. याच उद्देशाने आपण शोषित, पिडित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी चिंचाबा भर सर्कलमधून जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहोत. सदर जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे माझ्या सौभाग्यवती संगीता अशोकराव सानप यांच्या रूपाने ही निवडणूक लढवणार आहोत. तद्वतच संगीता सानप ह्या चिंचाबा भर ग्राम पंचायतच्या माजी सरपंच राहिलेल्या आहेत. त्यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव आणि समाज कार्य करण्याची आवड ही आमच्या उमेदवारीसाठी खुप मोठी जमेची बाजू आहे. शिवाय मी स्वतः १९९५ पासून ते आजमितीपर्यंत भाजपचा सक्रीय कार्यकर्ता आहे. दरम्यानच्या काळात भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत विविध पदाची प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडून पक्ष वाढीसाठी काम केले आहे. त्यामुळे आपसुकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझी नाळ जोडली गेली असल्याचे अशोकराव सानप यांनी आवर्जून सांगितले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि त्यांच्या सोबत असलेले वैक्तिक सबंध विषद करतांना सानप म्हणाले की, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शामभाऊ बढे यांचे वडील शेषरावजी बढे यांच्यापासून आमचे घरोब्याचे सबंध आहेत. सुरुवातीला युवा मोर्चाच्या मंडळ अध्यक्षापासून कामाला सुरुवात केली. त्यानंतर युवा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. तर सुरेशभाऊ लुंगे जिल्हाध्यक्ष असतांना त्यांच्या सोबत जिल्हा चिटणीस म्हणून काम केले आहे. तर स्व. राजेंद्रजी पाटणी आमदार असताना बूथ संयोजक म्हणून काम पाहिले आहे. शामभाऊ बढे सोबत जिल्हाउपाध्यक्ष पद भूषविले आहे. तर किसान मोर्चाची प्रदेश सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पक्षासाठी सेवा पंधरवड्यात सह संयोजक असताना विविध सामाजिक व राजकीय अनुभव शिकावयास मिळाले आहेत. सौभाग्यवती संगीता सानप ह्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या कट्टर समर्थक असल्याने भाजपाशी त्यांची सुद्धा नाळ घट्ट जुळलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतरावभाऊ देशमुख, भाजपाचे प्रचारमुख ॲड. नकुल देशमुख आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्यासह ईतर वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. परिणामी केवळ उमेदवारीच नव्हे; तर विजयी होण्याची शंभर टक्के गॅरंटी असल्याचे अशोकराव सानप यांनी सिटीन्यूज सुपरफास्टशी बोलतांना ठासून सांगितले आहे.

राजकीय हालचालींना वेग, नेते मंडळी ॲक्टिव्ह मोडवर..!

जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाले असून सोबतच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांचे सुद्धा आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकंदरीत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. मात्र नगर परिषदा आधी होतील की जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आधी होतील हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. परंतु कोणतीही निवडणूक आधी झाली तरी त्या निकालाचे पडसाद पुढील निवडणुकीत उमटू शकतात हे निर्विवाद सत्य आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका शहरापुरत्या मर्यादित असल्या तरी या निवडणुकांच्या निकालावरच पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते ॲक्टिव्ह मोडवर आले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर निवडणूक घोषित झाल्यास लवकरच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरेसुद्धा वाढू शकतात असे राजकीय तज्ञ बोलत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular